गर्दी नियंत्रणात ठेवणे कामी कडक उपाययोजना राबविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 


बारामती(सुरज देवकाते):बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका, सर्वांनी गंभीरपणे घ्या, गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

        बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात 'कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुखमंत्री बोलत होते. बैठकीला पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षण पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमण, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. 

     अजित पवार म्हणाले की, सध्या पुणे जिल्ह्यात तसेच बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. काही नागरिक मास्क वापरतांना दिसत नाहीत. तसेच बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत, यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री याची कमतरता भासणार नाही याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुणे जिल्ह्यात केंद्रीय पथकाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत निरीक्षण केले आहे. पुढचे दोन महिने खूप धोक्याचे आहेत, असा त्यांनी इशारा दिला.

       त्यांच्या निरीक्षणावरून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बारामती येथील वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेते सचिन सातव यांनी बारामती तालुक्यात कोविड नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि अडीअडचणी सांगितल्या.

Comments

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई