प्रकाश सादळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
मराठी श्रमिक पत्रकार संघाचा आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार"
इस्लामपूर (प्रतिनिधी/इकबाल पीरज़ादे)
वाळवा तालुका मराठी श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा 2021 आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार दैनिक तरुण भारतचे ऐतवडे बुद्रुक पत्रकार प्रकाश सादळे यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण पत्रकार दिनानिमित्त गुरुवार दिनांक ६ रोजी इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे व इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते, भारतीय लोकशाही बळकट होण्यासाठी पत्रकार विशेष योगदान देत आहेत. यातीलच एक पत्रकार म्हणजे प्रकाश गुंडा सादळे.
सादळे यांनी ग्रामीण भागात पत्रकारिता क्षेत्रासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहेत. प्रकाश सादळे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील ढगेवाडी या छोटेशा खेडेगावात झाला असून घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तरीही परिस्थितीशी दोन हात करत आपला जीवनातील संघर्ष त्यांनी सुरूच ठेवला आहे. कराड येथून प्रकाशित होणाऱ्या प्रीतीसंगम या दैनिकाच्या माध्यमातून प्रकाश सादळे यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासास सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा येथून प्रसिद्ध होत असलेल्या साप्ताहिक वारणेचा वाघ या साप्ताहिकासाठी काहीकाळ लिखाण केले. त्यावेळी त्यांना वारणेचा वाघ ज्ञानप्रबोधनीचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या माध्यमातून वाळवा तालुक्यातील अनेक वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडत त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून केला.
त्यानंतर त्यांची दैनिक तरुण भारतसाठी ऐतवडे बुद्रुक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून प्रकाश सादळे हे नाव जिल्हाभर पसरले, आपल्या लेखणीला व लेखनाला विशेष दर्जा देत त्यांनी विविध सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित केले.
कुरळप पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी या परिसरातील विशेष समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे कामही त्यांनी केले. त्यांनी धडाडीचे पत्रकार हा लौकिक मिळवला आहे. राष्ट्रीय पेयजल योजना, गावांतर्गत रस्ते, ग्रामसचिवालय, सार्वजनिक सभागृहे यासह अंध, अपंगांच्या योजना मंजूरी मिळण्यासाठी व विकास कामे पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी लिखाण केले.
शालेय जीवनापासून त्यांना वाचन व लेखनाची आवड होती. त्याचा फायदा त्यांना पत्रकारिता क्षेत्रात झाला. त्यांनी पत्रकारिते बरोबरच सामाजिक क्षेत्राची विशेष योगदान दिले आहे. ढगेवाडी सारख्या ग्रामीण भागात कै. उषादेवी ढगे पाटील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बारा वर्षे काम केले आहे, त्यानंतर २००४ मध्ये स्वामी नरेंद्र महाराज स्वयंरोजगार संस्था तसेच २००६ मध्ये सह्याद्री निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करून अनेक उपक्रम योजना राबवले आहेत. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागात पत्रकारिता करणे फार जोखमीचे आणि अडचणीचे काम बनले आहे, मात्र ढगेवाडी येथील प्रकाश सादळे यांनी विविध संकटांचा सामना करीत पत्रकारिता क्षेत्रात आपले स्थान बळकट करताना ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आपल्या लेखणीतून न्याय मिळवून दिला आहे. आज पर्यंत केलेल्या पत्रकारितेच्या कार्याची दखल घेऊन वाळवा तालुका श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने २०२१ या आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित जाधव,जेष्ठ पत्रकार विशवास धस प्रा संजय थोरात यूवराज निकम विनायक नायकल, युनूस शेख, इकबाल पीरज़ादे, प्रकाश बनसोडे, हैबत पाटील, सुनील पाटील सिद्धार्थ कांबळे विनोद मोहिते, विजय पाटील मानाजी धुमाळ इ. मान्यवर उपस्थित होते
Comments
Post a Comment